Thursday, August 19, 2021

आता बसणार चांगलीच फोडणी! खाद्यतेलाच्या किंमतीं होणार कमी; सरकारची 'इतक्या' कोटींची नवी योजना

नवी दिल्ली : देशातील खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असताना मोदी सरकारने गृहिणींना एक दिलासादायक बातमी दिली आहे. सरकारने नव्या योजनेची घोषणा केली असून या घोषणेचा डायरेक्ट परिणाम खाद्य तेलाच्या किंमतींवर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रातील मोदी सरकारने पाम ऑईल मिशन योजनेला मंजुरी दिली असून देशातील खाद्यतेलाचे उत्पादन वाढवण्यासाठी 11,040 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाम ऑईल हे एक प्रकारचं खाद्यतेल असून ताडाच्या बियांपासून हे तेल काढण्यात येत आहे.



खाद्यतेलाबाबतीत आत्मनिर्भर होण्याचा प्रयत्न भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत सध्या आयात केलेल्या तेलावर अवलंबून राहावे लागते. हे अवलंबित्व कमी करून खाद्यतेलाच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठीच या योजनेची आखणी करण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटले आहे.


राष्ट्रीय खाद्य तेल मिशन - ऑईल पाम असे या योजनेचे नाव असून देशातील अनेकांना त्यातून रोजगारदेखील उपलब्ध होणार आहेत. ही योजना भारताला खाद्यतेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवेल, असा विश्वास कृषीमंत्री तोमर यांनी व्यक्त केला आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार असून तेल उद्योगाला याचा फायदा होणार असल्याचेही सांगितले जात आहे.


खाद्यतेलाशी संबंधित उद्योगांच्या उभारणीसाठी सरकारकडून 5 कोटी रुपयांच्या मदतीचीही घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली असून नॅशनल मिशन ऑन आईल सिड्स आणि ऑईल पामच्या माध्यमातून सरकार 11 हजार कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले आहे.


काल केंद्र सरकारने दोन मोठे निर्णय़ घेतल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी दिली आहे. पाम तेलासाठीच्या कच्च्या मालाची किंमत सरकार निश्चित करणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचा बाजारभाव कमी झाला, तर शेतकऱ्यांना तितक्या फरकाची सबसिडी दिली जाणार आहे. तर तेल उद्योगसाठी 5 कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णयदेखील केंद्र सरकारने घेतला आहे.

अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये आश्रयाला



दुबई - तालिबानने अफगाणिस्तानावर ताबा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आपल्या कुटुंबासह अबू धाबीमध्ये असल्याची माहिती मिळत असून या वृत्ताला संयुक्त अरब अमीरातच्या (यूएई) विदेश मंत्रालयाने दुजोरा दिला आहे.



यूएईच्या विदेश मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टिकोनातून आश्रय दिला आहे. दरम्यान, अशरफ घनी आणि त्यांचे कुटुंबिय अबू धाबीमध्ये नक्की कोणत्या ठिकाणी आहेत, यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

संयुक्त अरब अमीरातने (यूएई) म्हटले आहे की, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ घनी आणि त्यांच्या कुटुंबियांना त्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वीकारले असून त्यांना आश्रय दिला आहे. दरम्यान अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी काबूलवर कब्जा मिळवला आहे. देश सोडल्यानंतर आता अशरफ गनी यांनी स्वतः खुलासा केला आहे. या खुलासात त्यांना अफगाणिस्तान का सोडावे लागले, हे फेसबूकवर पोस्ट करत सांगितले आहे.


रविवारी अशरफ गनी यांनी म्हटले होते की, अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानने प्रवेश केल्यानंतर आपण होणाऱ्या रक्तपातापासून वाचण्यासाठी देश सोडला. आपल्या फेसबूक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये गनी म्हणाले की, एका कठिण निर्णयाचा सामना करावा लागला. ज्यात 20 वर्षांच्या युद्धानंतर लाखो काबूल रहिवाशांचे भवितव्य आणि शहराची सुरक्षा धोक्यात आली होती. ज्यात अगोदरच असंख्य लोक मारले गेले होते. रक्तपातापासून वाचण्यासाठी मी विचार केला की, देश सोडणे हा एकमेव पर्याय असेल.


तालिबानी जे नंतर काबूलमधील राष्ट्रपती भवनात घुसले. तालिबान आता एक ऐतिहासिक परीक्षेचा सामना करत आहे. तालिबानने तलवार आणि बंदूकीच्या निर्णयात विजय मिळवला. आता आमच्या देशबांधवांचा सन्मान, समृद्धी आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांची आहे. आता तेच अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवतील.

Wednesday, August 18, 2021

ठाणे ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेससह कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

ठाणे : ग्लोबल कोवीड सेंटरमधील डॉक्टर, नर्सेससह इतर कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला गेल्याच्या निषेर्धात बुधवारी रुग्णालयातील या सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले.

कामावर परत घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स, नर्स आणि कर्मचारी हे आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचार्यांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता अचानकपणो कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ग्लोबल रुग्णालयात जाऊन आंदोलन करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेसची भेट घेऊन या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन दिले आहे. तर पालिका प्रशासनाच्या वतीने तीन दिवसांचा वेळ मागितला असून त्यानंतर यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.



ठाणे महापालिकेच्या कोव्हीड हॉस्पिटलमध्ये कोरीनाच्या पहिल्या लाटेपासून कंत्राटी पद्धतीने डॉक्टर्स आणि नर्स यांची भारती करण्यात आली होती. पहिला आणि दुसऱ्या लाटेमध्ये या कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. मात्र आता दुसरी लाट ओसरू लागली असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून अचानकपणे कामावरून कमी करण्याच्या नोटीसा सबंधित कंपनीकडून देण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील अशाच प्रकारे नोटीस न देता या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले होते. त्यावेळी देखील अशाच प्रकारे कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन करण्यात आले होते.यावेळी देखील सबंधित ठेकेदाराकडून या सर्व कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले असल्याने काम बुधवारी सकाळपासूनच काम बंद अनोद्लन छेडण्यात आले होते. सुमारे ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स आणि नर्स तसेच वार्डबॉय या आंदोलनात सहभागी झाले होते.

तर बेमुदत रुग्णालय बंद करू - प्रवीण दरेकर यांचा इशारा 

ग्लोबलमध्ये डॉक्टर्स आणि नर्स यांनी आंदोलन छेडल्यानंतर या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी यांनी ग्लोबलमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. कोरोन काळत या सर्व कर्मचाऱ्यांनी काम केले आहे. आता गरज संपली तर अशा प्रकारे यांना काढून टाकणे योग्य नसल्याचे दरेकर यांनी सांगितले. जोपर्यंत कंत्राट सुरु आहे तोपर्यंत या सर्व कर्मचाऱ्यांना काढण्यात येऊ नये तसेच संबधित एजन्सी बदलण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. यासंदर्भात त्यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याशी देखील चर्चा केली असून तीन दिवसांत यावर काही निर्णय न झाल्यास पुन्हा या ठिकाणी येणार असून योग्य निर्णय न घेतल्यास बेमुदत संप करून रुग्णालय बंद करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला .तसेच त्यांनी महापालिका प्रशासनालाही यावेळी अल्टीमेंटम देत, ओम साई एजन्सीची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगत, मेहनत घेणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना सामावून घ्या अशीही मागणी केली आहे. तसेच महापालिका प्रशासनास याबाबत एक दिवसाची वेळ दिली आहे.


प्रशासनाने मागितली तीन दिवसांची मुदत


ग्लोबल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात प्रवीण दरेकर यांच्या प्रामुख्याने तीन मागण्या असून यामध्ये त्यांना जोपर्यंत कंत्राट आहे तोपर्यंत या कर्मचाऱ्यांना कमी करण्यात येऊ नये, मनमानी पद्धतीने कमी पगार कमी करण्यात येऊ नये तसेच पुढे या कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करून घेणे अशा आहेत. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्तांशी चर्चा झाली असून त्यानंतर पालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी तीन दिवसांची मुदत मागितली असल्याची माहिती यावेळी ग्लोबल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली आहे.

भारतीय रेल्वेने कोरोना काळात स्क्रॅप विकून कमावले 391 कोटी रुपये

नवी दिल्ली । कोरोनामुळे, जेथे 2020 मध्ये घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे प्रवासी गाड्या पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या, दुसरीकडे, मध्य रेल्वेने याच कालावधीत रेल्वे परिसरात असलेल्या कचऱ्यापासून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

मध्य रेल्वेने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, 2020-21 मध्ये मध्य रेल्वेने कचऱ्यापासून 391 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.



मध्य रेल्वेला 391 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळते 

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की,'लॉकडाऊन दरम्यान, मध्य रेल्वेने विविध रेल्वे परिसरातील कचरा विकून 391 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे, यामुळे रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्यात खूप मदत झाली आहे. यामध्ये मध्य रेल्वेच्या अनेक विभागांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे.


मध्य रेल्वेने सुरू केले झिरो स्क्रॅप मिशन 

वास्तविक, मध्य रेल्वेने झिरो स्क्रॅप मिशन सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मध्य रेल्वेचे प्रत्येक विभाग, कारखाना आणि शेड स्क्रॅप सामग्रीपासून मुक्त असल्याची खात्री करण्यात आली आहे. या स्क्रॅपमध्ये स्क्रॅप रेल, कायमस्वरूपी साहित्य, खराब झालेले डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह इ. सामील आहेत. 8.65 कोटी रुपयांच्या उत्पन्नासह मध्य रेल्वेने ई-लिलावाद्वारे या साहित्याची विल्हेवाट लावली आहे.


माहितीनुसार, मध्य रेल्वेने 2020-21 मध्ये कचऱ्याद्वारे मिळवलेली रक्कम गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक आहे. याचा एक फायदा असा झाला की, लॉकडाऊन दरम्यान प्रवासी गाड्या बंद केल्यामुळे रेल्वेला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यात मदत झाली. 2020-21 दरम्यान विक्रमी कमाई केल्यानंतर आता मध्य रेल्वेने 2021-22 साठी 400 कोटी स्क्रॅप विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे.

Tuesday, August 17, 2021

गजानन काळे अडचणीत; नवी मुंबई पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू

नवी मुंबई : नवी मुंबईतील मनसेचे नेते आणि शहराध्यक्ष गजानन काळे (MNS Navi Mumbai chief Gajanan Kale) यांच्या अडचणीत आता वाढ होताना दिसत आहे. गजानन काळे यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर सोमवारी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत तात्काळ अटकेची मागणी केली. त्यानंतर आता नवी मुंबई पोलिसांकडूनही (Navi Mumbai Police) गजानन काळे विरोधात शोधमोहिम हाती घेण्यात आली आहे त्यामुळे गजाजन काळे यांना कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




सोमवारी नवी मुंबईत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले होते त्यावेळी त्यांना गजानन काळे प्रकरणारवर विचारले असता त्यांनी म्हटलं, या प्रकरणी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आल्याचं वृत्त मिड्डे ने दिलं आहे. त्यामुळे गजानन काळे यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याचं दिसत आहे. नवी मुंबईत मनसेच्या गोटात खळबळ, गजानन काळेंवर पत्नीकडून गुन्हा दाखल गजानन काळे यांच्या पत्नीने नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत म्हटलं आहे की, गजानन काळे गेल्या काही वर्षांपासून आपल्याला मारहाण करत असून जातीवाचक शिवीगाळ सुद्धा करतो.


इतकेच नाही तर त्याचे बाहेरील महिलांसोबत संबंध असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. आमचं लग्न 2008 मध्ये झालं आणि लग्नानंतर 15 दिवसांनी गजानन माझ्यासोबत किरकोळ घरगुती कारणांवरुन तसेच माझा सावळा रंग, जात यावरुन टोमणे मारत असल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. शिवसेनेकडून अटकेची मागणी शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनीही नवी मुंबई पोलिसांना पत्र लिहून गजानन काळेला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच आरोपी विरुद्ध असणारे पुरावे उपलब्ध करुन घ्यावेत आणि आरोपीला कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने चौकशी करुन लवकरात लवकर चार्जशीट न्यायालयात दाखल करावी असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

मोनोरेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसीबीच्या जाळयात अडकला

मुंबई : कंत्राटदार कंपनीकड़ून २० लाख रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी मोनोरेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीओओ) डॉ. डी. एल.एन. मुर्ती लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळयात अडकले आहे. याप्रकरणी एसीबीने गुुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांची फॅसिलिटी मॅनेजमेंट कंपनी असून कंपनीला मुंबई मोनोरेल प्रकल्पाअंतर्गत साफसफाई, हाउसकिपींग, मेंटनन्स, कस्टमर सर्व्हिसचे जानेवारी २०१९ ते ऑगस्ट २०२० पर्यंतचे कंत्राट मिळाले होते. ऑगस्ट २०२० रोजी कंत्राटाप्रमाणे काम पूर्ण केले. ठरल्याप्रमाणे कामाचे बिल २ कोटी १० लाख तसेच २२ लाख गँरंटी रक्कम अदा करण्यात होती. त्यापैकी, ४० लाख रूपयांचे बिल आणि ११ लाख गँरंटी रक्कम मुंबई मोनोरेलकड़े थकीत होते.



मूर्ती यांनी तक्रारदार यांची फाईल स्वतःकड़े अडकवून २० लाख रूपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने एसीबीकड़े धाव घेतली. गेल्या महिन्यात २ जुलै रोजी एसीबीने केलेल्या पडताळणीत मूर्ती यांनी पैसे मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, सोमवारी याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. यात, मूर्ती यांच्या मालमत्तेची कुंडलीही एसीबीकड़ून काढण्यात येत आहे.

एअर फोर्सचं विमान 120 नागरिकांना घेऊन भारतात दाखल, भारत माता की जयच्या घोषणेनं मायभूमीत स्वागत

नवी दिल्ली: अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचे विमान 120 भारतीयांना घेऊन गुजरातच्या जामनगर येथे उतरलं. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या विमानाने उड्डाण केलं होतं.


120 भारतीय परतले


भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानातून 120 भारतीय नागरिकांना घेऊन काबूल येथून विमान आज सकाळी भारताकडे रवाना झाले होते.



गुजरातमधील जामनगर विमानतळावर हे विमान उतरलं. मायदेशी परत आणले गेलेले सर्व अफगाणिस्तानातील भारतीय राजदूत कार्यालयाचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी होते. याशिवाय भारतीय पत्रकारांना देखील माघारी करण्यात आलं आहे. गुजरातच्या जामनगर येथे या विमानातून मायदेशी परतलेल्या नागरिकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.


जल्लोषात स्वागत


अफगाणिस्तानातून परत आलेल्या लोकांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आलं. तिथून बस द्वारे त्यांना पुढे पाठवण्यात आले. यावेळी लोकांनी भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील परिस्थिती बिघडत चालली असल्यामुळे सोमवारी विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. मात्र, अमेरिकी सैन्य दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्यामुळे मंगळवारी पहाटेपासून विमानतळ सुरू झालं. यानंतर भारतीय विमानाने तिथून उडाण केलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. भारतीय नागरिकांना आपल्या देशात परत आणलं गेलं.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...