मुंबई : हिंदुस्थानात मुलांच्या जन्मापासूनच ही कुपोषणाची समस्या दिसून येते. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्येही ती गंभीर होत चालली आहे. कुपोषणामुळे केवळ शारीरिक आणि मानसिक अपंगत्वच नव्हे तर प्रसंगी मृत्यूही ओढवतो. या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी पवई येथील आयआयटी मुंबईतील संशोधकांनी सात प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश असलेला 'सेव्हन-इन-वन सकस आहार' बनवला आहे. बालके बोटं चाटतील असा हा आहार फक्त पाच मिनिटांत बनवता येऊ शकतो. बालकांना आवडतील असे लाडू, शंकरपाळ्या, खीर, लापशी, उपमा, झुणका, नानकटाई आदी पदार्थ त्यापासून बनवता येऊ शकतात.
कुपोषणाच्या समस्येचे निर्मूलन करण्यासाठी आयआयटी मुंबईतील ज्येष्ठ संशोधक प्रा. पार्थसारथी यांच्या नेतृत्वाखालील टीमने बालकांसाठी हा सकस आहार बनवला.
कुपोषण रोखण्यासाठी पेंद्र सरकारकडून कार्यक्रम राबवला जातो. त्याअंतर्गत बालकांना आहार पुरवला जातो. तो आहार प्रामुख्याने ग्रामीण बालकांना नजरेसमोर ठेवून बनवला गेला आहे. शहरी भागातील झोपडपट्टय़ांमध्येही कुपोषणाची समस्या आहे. त्या समस्येचा सामना करण्यासाठी तो आहार पुरेसा नाही.
प्रा. पार्थसारथी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करणाऱया आहारामध्ये पोषक घटकांचे प्रमाण अधिक आहे. लहान बालकांसाठी आहार बनवताना त्यांना आवडणारी चव, त्यांना आवडतील असे पदार्थ यांचा विचार केला गेला. त्याबाबतचा अहवाल 'पिडीयाट्रीक ऑनकॉल' या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. तो आहार बनवण्यापूर्वी संशोधकांनी 300 सरकारी अंगणवाडय़ा आणि धारावीतील बालक कल्याण पेंद्रांतील बालकांचा अभ्यास केला.
मुलांच्या वाटय़ाचा पोषक आहार कुटुंबात विभागला जातोय
सध्या सरकारकडून बालकांना पोषक आहार रेशन स्वरूपात दिला जातो. त्यात अन्नधान्ये, पीठ यांचा समावेश असतो. तो घरी नेऊन बनवला जातो. तो कशा पद्धतीने बनवला जातोय यावरही त्यातील पोषक घटकांचे प्रमाण अवलंबून असते. सरकारकडून सोयाबिनचे तसेच डाळींचे पीठ मुलांना दिले जाते. त्यात झिंक, लोह, कॅल्शियम तसेच 'अ' आणि 'क' जीवनसत्त्वांचा समावेश असतो. परंतु पिठाच्या पिशव्या मुले घरी घेऊन जातात तेव्हा त्या फक्त त्यांच्यासाठीच वापरल्या जात नाहीत तर संपूर्ण कुटुंबासाठी वापरल्या जातात. त्यामुळे मुलांना पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळत नाहीत असे दिसून आल्याचे प्रा. पार्थसारथी यांनी सांगितले.
दोन वर्षांखालील बालकांसाठी उपमा, खीर, धान्यपीठांचे मिश्रण असलेली टेस्टी पेस्ट. दररोज 250-300 किलो कॅलरीज आणि 10-12 ग्रॅम प्रोटीन्स.
दोन वर्षांवरील बालकांसाठी नानकटाई, शंकरपाळी आणि झुणका बनवता येईल असा सकस आहार. दररोज 450-500 किलो कॅलरीज आणि 12-15 ग्रॅम प्रोटीन्स.
तीन महिन्यांमध्ये बालकांच्या प्रकृतीमध्ये जाणवला फरक.
सरकारी कार्यक्रमात आहाराचा समावेश करण्याची संशोधकांची विनंती.
No comments:
Post a Comment