श्री विठ्ठल मंडळ-ठाणे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा-२०२२.
संघर्ष मंडळ महिलांत उपांत्य फेरीत, तर ओम् कबड्डी, जय हनुमान पुरुषांत उपांत्यपूर्व फेरीत दाखल.
ठाणे दि. ०९ :- संघर्ष मंडळाने श्री विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित महिलांत उपांत्य फेरीत धडक दिली. पुरुषांत ओम कबड्डी, जय हनुमान मंडळाने उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठाण्याच्या लोकमान्य नगरात सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात ठाण्याच्या संघर्ष मंडळाने नवी मुंबईच्या रा.फ.नाईक या बलाढ्य संघाला २८-२५ अशी धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. आक्रमक खेळाची सुरुवात करीत पहिल्याच डावात १८-११ अशी आघाडी घेणाऱ्या संघर्षने दुसऱ्या डावात सावध खेळ करीत ही आघाडी टिकविली आणि सामना आपल्या बाजूने झुकविला. देवयानी पाटील,स्नेहा म्हात्रे, प्रतीक्षा मारकड यांच्या चढाई-पकडीचा खेळ या विजयात महत्वाचा ठरला. तनुजा गोळे, तृप्ती मोरे यांच्या खेळाचा आज प्रभाव पडला. या अगोदर झालेल्या महिलांच्या सामन्यात ठाण्याच्या होतकरू मंडळाने ५-५ चढायांच्या डावात चिंतामणी स्पोर्ट्स संघावर ३१-२७(९-५)असा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरी गाठली. प्राजक्ता पुजारी,चैताली बोराडे, सायली शिंदे, वृषाली गाला यांच्या चतुरस्त्र खेळाने होतकरूने पूर्वार्धात १७-०९अशी मोठी आघाडी घेतली होती.पण उत्तरार्धात रेखा चिकणे, रुचिता मोडक, प्रतीक्षा जाधव, वैष्णवी गेडाम यांनी आपला खेळ उंचावत चिंतामणीला २२-२२ अशी बरोबरी साधून दिली. पण विजय मात्र त्यांच्या हातून निसटला. जादा डावात होतकरून बाजी मारली.
प्रथम श्रेणी स्थानिक गटात ओम कबड्डी कल्याण संघाने मध्यांतरातील ०७-१० अशी ३गुणांची पिछाडी भरून काढत अश्वमेध स्पोर्ट्सचा २०-१५ असा पाडाव करीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. जयंत काते, जय गिरीधर यांच्या अष्टपैलू खेळाला या विजयाचे श्रेय जाते. अश्वमेधच्या महेश शेलार, मयूर कदम यांना पूर्वार्धातील खेळातील चमक उत्तरार्धात न दाखविता आल्याने पराभवाचा सामना करावा लागला. काल्हेरच्या जय हनुमान संघाने ठाण्याच्या मावळी मंडळाला २८-२५ असे नमवित उपांत्यपूर्व फेरी गाठली. पूर्वार्धात १०-१८ अशा ८गुणांनी पिछाडीवर पडलेल्या जय हनुमानने उत्तरार्धात जोशपूर्ण खेळ करीत बाजी पलटविली. गौरव पाटीलचा अष्टपैलू खेळ त्याला वैभव पाटीलची मिळालेली उत्तम साथ यामुळे जय हनुमानने ही किमया साधली. मावळीच्या ज्ञानेश भिलारे, अभिजित घरे यांचा खेळ उत्तरार्धात थोडा कमी पडला. इतर सामन्यांचा निकाल संक्षिप्त :- महिला गट १)छत्रपती शिवाजी मंडळ वि वि स्फूर्ती सेवा मंडळ(४५-३८); २)संकल्प मंडळ वि वि अश्वमेध फाउंडेशन (२३-१५). प्रथम श्रेणी स्थानिक पुरुष गट :-१) छत्रपती शिवाजी मंडळ वि वि नवी मुंबई प्रबोधिनी(३३-२७); २)श्री हनुमान मंडळ वि वि ओम न्यूवर्तक स्पोर्ट्स(३३-२६).