Monday, August 23, 2021

यंदाही दहिहंडीला परवनागी नाही; मुख्यमंत्री, दहीहंडी उत्सव आयोजकांच्या बैठकीत निर्णय

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गोविंदा पथकं आणि दहिहंडी उत्सव आयोजक यांच्यात दहिहंडीच्या आयोजनासंदर्भात महत्त्वाची बैठक सध्या सुरु आहे.

दहिहांडीऐवजी मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी द्या, अशी मागणी गोविंदा पथकांची होती. तसेच गर्दी टाळण्यासाठी सुरक्षेचं पाऊल उचलावं लागेल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. त्यानंतर सर्व बाबींवर सखोल चर्चा केल्यानंतर यंदाही दहिदंडीला परवानगी देण्यात आलेली नाही.



बैठकीत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, "आपल्या सर्वांच्या भावना सारख्याच आहेत. आपले सण आपण जपलेच पाहीजेत. पण, आता प्रश्नं आरोग्याचा आहे. याचा विचार करता आपल्याला आरोग्याचा विचारालाच प्राधान्यांनं करावा लागेल. आम्ही असा निर्णय घेताना अनेकजण आंदोलन करणार असल्याचं जाहीर करतात. मग, आंदोलन करायचं असेल तर कोरोना विरोधात करा ना."



"बाळ गोपाळांचा हा उत्सव आहे. गेल्या वर्षीपासून जी लहान बालकं अनाथ झालेली आहेत. त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहावं. लस घेतल्यावर देखील काही देशांत लॉकडाऊन करण्यात आला आहे. इस्त्रायलनं तर पुन्हा मास्क घालायला सुरुवात केली आहे. अर्थ चक्र चालवण्यासाठी आपण थोडी शिथिलता दिली आहे. कारण अनेकांची हातावर पोटं आहेत. त्यांच्यासाठी आपण हा निर्णय घेतला आहे. आपण जर समजूतीनं वागलो नाही तर धोका अटळ आहे. एकदा हे संकट पूर्णपणे घालवूया. आपण यंत्रणेत कुठेही ढिलाई होऊ देत नाही. नीती आयोगानं जे सांगितलंय, ते लक्षात घेतलं पाहीजे. गेल्या दीड वर्षात आपण जी आरोग्य सेवा वाढवली आहे, ती इतर कोणत्याही राज्यानं वाढवलेली नाही.", असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.



"आपण दुसऱ्या लाटेत डॉक्टरांच्या मेहनतीमुळे बाहेर पडलोय. आता जी विंडो आपल्याला मिळाली आहे. तिचा वापर आपण थोडं अर्थचक्र सावरण्यासाठी करूया. पुन्हा ती काळरात्र नको. जनतेचे प्राण वाचवण्यासाठी आपण आपली संस्कृती परंपरा देखील काहीवेळ बाजूला ठेवून समजूतीने गर्दी टाळण्यासाठी आपल्याला सुरक्षेचे पाऊल उचलावं लागेल.", असंही मुख्यमंत्री म्हणाले.



दहीहंडी समन्वय समितीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे काय मागण्या केल्या होत्या?



1. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी.

2. दहीहंडी फोडताना मानवी मनोरे उभारण्यासाठी सर्व गोविदांचे दोन्ही लसीकरण पूर्ण करणं आवश्यक आहे. तशी तयारी गोविंदा पथकांनी केली आहे.

3. गोविंदा पथक हे दुसरीकडे कुठेही दहीहंडी फोडण्यासाठी जाणार नाहीत. 

4. कोविड-19 संसर्गाची जाणीव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी.

5. दहीहंडी फोडताना कोणतीही गर्दी होणार नाही याची काळजी गोविंदा मंडळं घेतील.

चंद्रपुरात माणुसकीला कलंक; जादूटोण्याच्या संशयावरून दलित कुटुंबाला भर चौकात बेदम मारहाण

चंद्रपूर - जिल्ह्यातील जिवती या तालुक्याच्या ठिकाणापासून १२ किमी अंतरावर असलेल्या वणी खुर्द या गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी मिळून दलित समाजातील काही लोकांना भरचौकात हातपाय बांधून बेदम मारहाण केली आहे.

या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी कि,'वणी खुर्द या गावातील काही कुटुंब जादूटोणा करतात असा संशय नागरिकांना होता, मोहरमच्या सवारी दरम्यान काही महिलांच्या अंगात भानामती आली असल्याचा प्रकार घडला. त्यांनी गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असे सांगितले व लगेच गावकऱ्यांनी कसलाही विचार न करता त्या कुटुंबातील सदस्यांना बांधून मारहाण केली. इतकेच नव्हे तर त्या सर्वांना भर चौकात लाथा बुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण केली.



या घटनेत शांताबाई कांबळे (५३), साहेबराव हूके (४८), पंचकुला शिवराज हूके (५५), प्रयागबाई हुके(६४), शिवराज कांबळे (७४) एकनाथ धुके(७०) अशी या गावात मारहाण झालेल्या जखमींची नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वेळीच गावात धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत स्थानिक पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी गावातील ऐकून १३ जणांवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली आहे.

महेश मांजरेकर यांना कर्करोगाचे निदान, मुंबईत झाली शस्त्रक्रिया

मुंबई: सुप्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांना कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना मूत्राशयाचा कर्करोग झाला असून नुकतीच मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात त्यांची शस्त्रक्रिया झाली.

यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे वृत्त ईटी टाईम्सने दिले आहे.




सध्या महेश मांजरेकर यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. महेश मांजरेकर किंवा कुटुंबीयांकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही.


महेश मांजरेकर यांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. मराठीतील अनेक लोकप्रिय आणि दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. आजघडीला मराठीतील एक प्रथितयश दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून महेश मांजरेकर यांचे नाव घेतले जाते.

Saturday, August 21, 2021

जनाशीर्वाद यात्रेवर मुंबईत दाखल झाले ३६ गुन्हे!


 मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशावरून केंद्रीय मंत्र्यांच्या जनाशीर्वाद यात्रा सुरु आहेत. या यात्रा सुरु हिऱ्यांच्या आधीपासूनच चर्चेत होत्या. केंद्र सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने सुरु केलेल्या जनआशीर्वाद यात्रेला आता पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे.

आत्तापर्यंत या यात्रेवर ३० हून अधिक गुन्हे मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. भाजपा नेत्यांनी काढलेल्या या यात्रेमध्ये करोना प्रतिबंधाचे नियमही धाब्यावर बसवल्याचं निदर्शनास आलं आहे.



गुन्ह्यांची संख्या ३६ वर


जनाशीर्वाद यात्रेवर आता पर्यंत ३६ गुन्हे दाखल झाले आहेत. भाजपाच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान करोना प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल झाल्याचं समोर आलं आहे. १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सात वेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.


जनाशीर्वाद यात्रा म्हणेज तिसऱ्या लाटेला आमंत्रण


केंद्रीय मंत्रिमंडळाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार जनाशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. जाणयात्रेवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. जन आशीर्वाद ही तर तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.


राज्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न


केंद्रीय मंत्र्यांची जनयात्रा सुरु असल्याने त्यावर आता विरोधी पक्षाने टीका करण्यास सुरुवात केली आहे. जनआशीर्वाद यात्रा म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे हे सर्वांना माहित आहे. सध्या ज्या प्रकारच्या गर्दीचं तुम्ही नियोजन करत आहात, शक्ती प्रदर्शने करत आहात. ते म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रणच आहे. ते मुद्दाम करत आहेत. राज्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. ठिक आहे काही अडचण नाही. तुम्ही किमान संयम पाळा, असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

Friday, August 20, 2021

भाजप नेते किरीट सोमैया यांच्या वाहनावर दगडफेक


वाशिम : भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर आज दगडेफक झाली तसंच त्यांच्यावर शाईफेकीचा देखील प्रयत्न झाला.

शिवसैनिकांनी हा सगळा प्रकार केल्याचा आरोप आहे. यावरतीच शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, आक्रमक शिवसैनिकांनी म्हणूनच दगडफेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.



‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले, दगडफेक झाली!’


शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या संस्थेच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्याची आज किरीट सोमय्या पाहणी करण्याकरिता आले होते. मात्र भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या यांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर दगड फेक आणि शाई फेक केली.


याविषयी खासदार भावना गवळी यांना विचारले असता, पार्टीकल बोर्ड कारखाना हा शेतकऱ्यांचा आहे. शिवाय पोलिसांनी कारखान्यावर जाऊ नका, असे सांगूनही ते गेले, त्यामुळं शेतकरी आणि शिवसैनिक आक्रमक झाले. त्याचमुळे दगड फेक झाली असावी, असं भावना गवळी म्हणाल्या.


सोमय्यांकडून भावना गवळींवर 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप


यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यामध्ये खासदार भावना गवळी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केला, असा आरोप सोमय्या यांनी केला होता.


आज सोमय्या वाशिम दौऱ्यावर आले असता भडकलेल्या भावना गवळींच्या समर्थकांनी सोमय्या यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक केली. यावेळी सोमय्य्या यांच्यासोबत भाजप आमदार राजेंद्र पाटणी होते.


शिवसेनेच्या धमक्यांना, हल्ल्यांना मी घाबरत नाही


शिवसेनेच्या धमक्यांना मी घाबरत नाही. अशा रोजच मला धमक्या येतात. मी आज वाशिम येथे आलो असता माझ्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अशा हल्ल्यांना मी घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना दिली.

खळ्ळ खट्याक! भिवंडीतील मालोडी टोल नाका मनसे कार्यकर्त्यांनी फोडला

भिवंडी - भिवंडीतील मानकोली अंजुरफाटा चिंचोटी रस्त्याची सध्या दुरावस्था झाल्याने मागील दोन दिवसांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी स्थानिक नागरिकांनी गाव विकास समितीच्या वतीने बुधवारी रास्ता रोको आंदोलन केले होते.



त्यांनतर गुरुवारी मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी या रस्त्यावरील मालोडी येथील टोल नाका गुरुवारी बंद केला होता. मात्र, मनसे कार्यकर्त्यांची पाठ फिरताच गुरुवारीच टोल वसूल करणाऱ्या सुप्रीम कंपनीने हा टोल नाका पुन्हा सुरु केला होता.

मनसे पदाधिकाऱ्यांनी टोल नाका बंद करूनही कंपनीने हा टोल नाका सुरु केल्याच्या निषेधार्थ मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी मालोडी येथील टोल नाका लोखंडी रॉडच्या साहाय्याने फोडला आहे. रस्त्याची कामे आधी पूर्ण करा मगच टोल नाका सुरु करा अशा घोषणा देखील यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने देण्यात आल्या.

Thursday, August 19, 2021

राज्यात मुसळधार पावासाचा इशारा ! पुढील 24 तासांत मुंबईसह या जिल्ह्यांना झोपडणार, अनेक भागात हाय अलर्ट

मुंबई : येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेने हा इशारा दिला आहे. आज उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाची रिमझिम आहे. दिवसभरात मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर जवळपास अर्ध्या महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.




यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार, जळगाव, जालना, बुलडाणा, वाशिम, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.


उद्या महाराष्ट्रात बुलडाणा, अकोला, वाशिम, नंदुरबार आणि पालघर जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर 20 ऑगस्टला अमरावती आणि नागपूरला यलो अ‌ॅलर्ट देण्यात आलाय. तर, उर्वरित महाराष्ट्रात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दरम्यान, दोन दिवसानंतर पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना आजही हवामान खात्याकडून (IMD Alerts) अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज राज्यातील तब्बल 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर एका जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट देण्यात आला आहे.

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा

भोंग्यांबाबत २ दिवसांत नियमावली जारी करणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची घोषणा मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्या...